सणासुदीत रोज पाणी; अखंडित वीज : महापालिका, महावितरणची भेटपुणे : ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणेकरांवर महावितरण व महापालिकेने मेहेरनजर दाखविली असून पाण्याची चणचण भासू नये, याकरिता ९ ते १४ नोव्हेंबर या काळामध्ये दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली, तर प्रकाशाचा हा उत्सव दणक्यात साजरा करता यावा, यासाठी महावितरणनेही याकाळात अखंडित वीजपुरवठा करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेचे पुणेकरांनी जोरदार स्वागत केले असले, तरीही पाणी जपून वापरण्याची जबाबदारीही सांभाळण्याची गरज आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाल्याने शहरामध्ये ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शुक्रवारी महापालिकेमध्ये गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे उपस्थित होते. दिवाळीमध्ये दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव उपमहापौर आबा बागुल यांनी ठेवला होता. त्यावर चर्चा होऊन पुणेकरांना दिवाळीच्या काळामध्ये पाणीकपातीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.महापौर धनकवडे यांनी सांगितले की, ‘दिवाळीच्या ६ दिवसांच्या कालावधीमध्ये पाणीकपातीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यासाठी राखीव पाण्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे.’बांधकाम, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर न करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहेत, यामधून मात्र सूट देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. केवळ अडीच हजार एमएलडी जास्तीचे लागणार०६ दिवस दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३ दिवसच अधिकचे पाणी शहराला दिले जाणार आहे. शहराला दिवसाला ८४० एमएलडी पाणी लागते. ०३ दिवसांसाठी केवळ २ हजार ५२० एमएलडी पाणी जास्तीचे लागणार आहे.दिवाळीमध्ये पाणीकपातीमध्ये सूट देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा, असे मत प्रशासनाकडून मांडण्यात आले होते. मात्र, शहराला किती पाणी द्यायचे, हे ठरवून देण्यात आले असून तो साठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यातून ही सूट देण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेला असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.चोवीस तास वीजपुरवठादिवाळीत भारनियमन बंद करून, वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी दिली. येत्या दोन दिवसांमध्ये सर्व कार्यकारी अभियंत्यांची बैठक बोलावून वीजबिले दुरुस्त करणे, दिवाळीपूर्वी खराब झालेले डीपीबॉक्स दुरुस्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. वीज मंडळाच्या प्रत्येक विभागामधील नवीन वीजकनेक्शन, वीजबिल दुरुस्तीचे कॅम्प लावण्यात येतील, इन्फ्राच्या माध्यमातून लवकरात लवकर ओव्हर हेड विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात येणर आहे. दिवाळीत शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, वीज पुरवठ्यामध्ये अडचणी येऊ नये, यासाठी मुख्य सब स्टेशनची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रामराव मुंढे यांच्याकडे केली. या वेळी मुंढे यांनी वीजपुरवठा खंडित न करण्याचे आश्वासन दिले.मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंढे यांची भेट घेतली. याप्रसंगी जोशी यांनी शहरातील प्रश्नासंदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना वीजबिले वाढवून आली आहेत. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी डीपीबॉक्सचे उघडे झाकण; तसेच बॉक्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. ते दुरुस्त करण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.भरवस्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी ओव्हर हेड वायर खाली आलेल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त कराव्यात, लोकांना रीडिंगप्रमाणे अचूक वीजबिल देण्यात यावे, अशा अनेक प्रश्नांबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. येत्या दोन दिवसांत सर्व कार्यकारी अभियंत्यांची बैठक बोलावून वीजबिले दुरुस्त करणे, दिवाळीपूर्वी खराब डीपीबॉक्स दुरुस्त करण्यात येणार आहेत. दिवाळीत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी मुख्य सब स्टेशनची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
पुणेकरांची दिवाळी
By admin | Updated: November 7, 2015 03:44 IST