पुणे : ‘‘संगीत आणि पुणं याचं एक अतूट नातं आहे. संगीताविषयी इथले कानसेन जागृत असल्याने कलाकाराला कुठं आणि कशी दाद द्यायची हे त्यांना अचूक कळते. पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत आहे, पुणं हे माझं दुसरं घरच आहे,’’ अशा शब्दातं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी दर्दी पुणेकरांवर स्तुतिसुमने उधळत पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या वतीने आयोजित पंधरावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिटी प्राईड कोथरूड येथे रंगला. या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शिका व अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुण्याविषयी बोलताना झाकीर हुसेन म्हणाले, वयाच्या सातव्या वर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तबलावादन करण्याची संधी मिळाली, संगीत, त्याची साधना म्हणजे काय? या गोष्टी पुण्यात आल्यानंतर कळतात. बालगंधर्व, कुमार गंधर्व, अप्पा जळगावकर यांना मी साथसंगत केली आहे. संगीत हे पुणेकरांच्या रक्तामध्ये आहे. नाट्यसंगीताचे वातावरण पुण्यात असल्याने शास्त्रीय संगीतालाही पुणेकरांनी आपलेसे केले. उर्दू गझलचे मुशायरेही इथे ऐकले जातात, भाषा भलेही कळत नसली तरी त्यामध्येही ते समरसून जातात. एस.डी. बर्मन यांच्या ‘डॉ. विद्या’ या चित्रपटात मी वादन केले आहे. ते म्हणजे संगीतातील देव आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्काराला मी खरच पात्र आहे का नाही, हे माहीत नाही, असे सांगून आपल्या मोठेपणाचे दर्शनही त्यांनी घडविले. तसेच आजचे संगीत हे चांगले आहे. ए. आर. रेहमान, शंकर एहसान लॉय यांच्यासारखे लोक चांगले काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.उद्घाटन सोहळ्याला प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), उपस्थित होते.डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. श्रीरंग गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीताची बीजे
By admin | Updated: January 14, 2017 02:45 IST