पुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी या वर्षातील कांद्याची दुसऱ्यांदा विक्रमी आवक झाली. दोन आठवड्यांपुर्वीच बाजारात हंगामातील कांद्याची सुमारे ३०० ट्रक विक्रमी आवक झाली होती. तेवढीच आवक रविवारी झाली. मात्र, आवक जास्त होवूनही मागणी असल्याने भावावर फारसा परिणाम झाला नाही.हंगामातील गरवी कांद्याची नियमित आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दोन आठवड्यांपुर्वी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे आदल्यादिवशी बाजारात कांद्याची मोठी आवक झाल्याचे बोलले जात होते. मात्र, रविवारी पुन्हा ३०० ट्रक आवक झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणत असल्याचे दिसून येते. सध्या कांद्याला मागील वर्षीपेक्षा चांगला व स्थिर भाव मिळत आहे. आवक जास्त होवूनही भावात फारशी घट होताना दिसत नाही. परिमाणी शेतकरी जास्त भावाची प्रतिक्षेत न राहता बाजारात कांदा आणत आहेत. रविवारी मार्केटयार्डात कांद्याला जागा न मिळाल्याने गुरांच्या बाजारात काही कांदा उतरवावा लागला. कांद्याला दहा किलोमागे १३० ते १६० रुपये भाव मिळाला. दोन आठवड्यांपुर्वीही एवढाच भाव मिळाला होता, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पुण्यात कांद्याची पुन्हा विक्रमी आवक
By admin | Updated: February 8, 2015 23:15 IST