पुणे : आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येणारे पुणे रेल्वे स्थानक रेल्वे मंत्रालयाच्या स्वच्छ भारत अभियानात चक्क शेवटच्या क्रमांकावर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये अ-१ यादीत पुणे रेल्वे स्थानकाचा शेवटाचा म्हणजेच ७५वा क्रमांक आला आहे. त्यामुळेच पुणे रेल्वे स्थानक हे अ-१ रेल्वे स्थानकांच्या यादीत सर्वाधिक अस्वच्छ ठरले आहे. तर, सुरत रेल्वे स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला. अ दर्जाच्या स्थानकांमध्ये पंजाबमधील बिस या रेल्वे स्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे मंत्रालयाने ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ हे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत अ १ दर्जाची ७५, तर अ दर्जाच्या ३३२ स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात प्रवाशांना ४० प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानुसार हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. काही महिन्यांपासून पुणे रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. स्वच्छता व सुरक्षा ठेवण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी अस्वच्छता किंवा कचरा रेल्वे स्थानकावर केल्यास तत्काळ ते साफ करण्यात येते. त्यामुळे रेल्वे स्थानक स्वच्छ असते. त्यामुळे हा निकाल पाहता यात मोठी तफावत आहे. हे योग्य नाही. प्रत्यक्षात समज व वास्तव यांच्यात प्रचंड फरक आहे. - बी . के. दादाभोय (व्यवस्थापक, पुणे विभाग)
पुणे रेल्वे स्थानक सर्वाधिक अस्वच्छ
By admin | Updated: March 19, 2016 02:54 IST