पिंपरी : महापौरचषक जिल्हास्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल (पासिंग) स्पर्धेत पुणे पोलीस संघाने दौंड व्हॉलीबॉल क्लब संघाचा २-०ने पराभव करीत पुरुष गटात विजेतेपद प्राप्त केले. महिलांमध्ये सिम्बायोसिस क्लब संघाने डेक्कन जिमखाना क्लबवर मात करीत महिलांमध्ये विजेतेपद मिळविले. महापालिकेतर्फे पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने जय गणेश युवा फाउंडेशनच्या सहकार्याने स्पर्धा विनायकनगर, बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथे स्पर्धा शनिवारी संपली. प्रकाशझोतात झालेल्या अंतिम सामन्यात पुरुषाच्या अंतिम लढतीत पोलिसांनी २५-१९, २५-१७ने पराभव केला. कल्पेश पटेल, अनुराग नाईक, भास्कर बुचडे यांनी चांगला खेळ करीत पोलिसांना विजय मिळवून दिला. दौंड संघाचा राज बांगर याने कडवी झुंज दिली. पुण्याचा अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.महिलांमध्ये सिम्बायोसिस संघाने डेक्कन जिमखाना क्लबचा २५-१९, २५-१५ असा पराभव करीत विजेतेपद राखले. महर्षी कर्वे स्पोटर््स क्लबने मिलेनियम स्कूल संघाचा पराभव करीत तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात पुणे पोलीस संघाने आरएसएफ संघाचा १५-१२, २५-१७ असा २-०ने पराभव केला. पोलीस संघाच्या कल्पेश पटेल, धनंजय ताराणे, भास्कर बुचडे यांनी सुरेख खेळ केला. आरएसएफच्या आकाश गिरमे याने कडवी झुंज दिली. दौंड व्हॉलीबॉल क्लब संघाने एबीएसफवर २५-१९, २५-२३ असा २-० ने पराभव केला. दौंड संघाच्या ओम बांगर, रोहित गायकवाड यांनी चांगला खेळ केला. पराभूत संघाच्या प्रीतम जाधव याची लढत एकाकी ठरली. स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. उपांत्यपूर्वी फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे : पुरुष गट : दौंड क्लब वि. वि. डेक्कन जिमखाना संघ २२-१५, १५-१३, २५-१०. पूना गुजराथी केळवणी मंडळ वि. वि. क्रीडा प्रबोधिनी २५-१३, २५-१२. वाघेश्वर संघ ‘क’ वि. वि. सिंबायोसिस क्लब २५-१७, २५-१४. एबीएसएफ वि. वि. वाघेश्वर संघ ‘अ’ २५-१९, २५-२३. पुणे पोलीस वि. वि. वाघेश्वर संघ ‘क’ २५-१२, २५-१३. राजू साबळे फाउंडेशन सासवड वि. वि. कॉर्पोरेट अॅथलेटिक्स क्लब २५-२०, २४-२६, १५-२.बक्षीस वितरण समारंभास क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर, नगरसेविका मंदा आल्हाट, नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे, अरुण बोऱ्हाडे, माजी उपमहापौर महमंद पानसरे, हरिभाऊ सस्ते, गणेश सस्ते, नितीन बोऱ्हाडे, सहायक आयुक्त दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते. अरुण बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन बोऱ्हाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पुणे पोलिसांना अजिंक्यपद
By admin | Updated: March 21, 2016 00:23 IST