पुणे : राज्यात सर्वाधिक विकसित, सर्वाधिक व्यवहार झालेल्या पुणे जिल्ह्यात रेडीरेकनर दरात राज्यातील सर्वाधिक 8.15 वाढ झाली आहे. यामध्ये देखील जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात व पीएमआरडीए क्षेत्रात घर घेणे अधिक महाग होणार असल्यास रेडीरेकनर दर तक्त्यांवरून स्पष्ट झाले आहे. नोंदणी विभागाने प्रथमच महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी स्वतंत्र रेडीरेकनर दर निश्चित केले आहेत.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने संपूर्ण राज्यासह पुणे जिल्ह्याचे रेडीरेकनर दर (वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते) नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवार (दि.31) रोजी जाहीर केले. जिल्ह्यात 1 एप्रिल पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. जिल्ह्यात गेले दोन वर्षांत झालेले मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार, गेल्या पाच वर्षांतील विकास, मेट्रो सिटी, पीएमआरडीए डीपीआर सर्व गोष्टीमुळे जिल्ह्यात सरासरी 8.15 टक्के रेडीरेकनर दर वाढविण्यात आले आहेत. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत दोन भाग करण्यात आले असून, मुख्य पुण्यात 6.12 टक्के दर वाढ करण्यात आली आहे. तर महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये 10.15 टक्के दर वाढ केली आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक दर वाढ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत म्हणजे 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात पीएमआरडीएचा डीपीआर जाहीर झाल्याने त्याचा परिणाम रेडीरेकनर दरावर झाला असून, ग्रामीण भागात सरासरी 11.03 टक्के दर वाढ करण्यात आली आहे.
पुणे शहरात 99 झोनमध्ये रेडीरेकनर दरात घट पुणे शहरात 935 झोन करण्यात आले असून, यापैकी 99 झोनमध्ये रेडीरेकनर दरात घट करण्यात आली तर, 137 झोनमध्ये कोणतीही वाढ न करता दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. तर कचराडेपो, स्मशानभूमी, दफनभुमी, कत्तलखाना, एसटीपी प्लॅन्ट लगत शंभर मीटर परिसरात देखील रेडीरेकनर दरात घट करण्यात आली आहे.
पुण्यात चार झोनमध्ये 25 टक्क्यांपेक्षा दरवाढ पुणे शहरामध्ये आंबेगाव खुर्द हायवे लगतच्या निवासी झोन, आंबेगाव गावठाण, वडगाव खुर्द औद्योगिक झोन आणि फुरसुंगी गावठाण परिसरात तब्बल 25 टक्क्यांपेक्षा अधिक दर वाढ झाली आहे.
- जिल्ह्यात सरासरी दर वाढ : 8.15 टक्के- जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रा 11.03 टक्के - पुणे शहर 6.12 टक्के - समाविष्ट 23 गावांत 10.15 टक्के- पिंपरी-चिंचवड शहरात 12.36 टक्के