पुणे (धनकवडी) : मेहुणीच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्याने एका इस्टेट एजंटचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ९ मे) रात्री साडे अकराच्या सुमारास पवारनगर, गुजरवाडी रोड येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.अधिकच्या माहितीनुसार, मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज)असे आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे आरोपी रोहित असोरे याच्याशी अनैतिक संबंध होते. मनोहर यांनी याला विरोध केला होता. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. शुक्रवारी रात्री रोहितने त्याचे दोन ते तीन साथीदार घेऊन मनोहर यांना पवारनगर येथे गाठले. ज्ञानदा अपार्टमेंटसमोर त्यांनी मनोहर यांना लाथा-बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. डोक्यावर गंभीर वार झाल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन पथके तयार करून पोलिसांनी मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून, तर केशवला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे इस्टेट एजंटचा खून; दोन आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 18:43 IST