पुणे : हेल्मेटविषयी जनजागृती करण्यासाठी शहर पोलीस दलाच्या वतीने येत्या रविवारी शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़ रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक शाखेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़ वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी याबाबतची माहिती दिली़ शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयापासून रविवार १५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ही दुचाकी रॅली सुरु होणार आहे़ त्यात वाहतूक शाखेचे ५०० अधिकारी, कर्मचारी तसेच १५० बायकर्सही सहभागी होणार आहेत़ या रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ ही रॅली मुख्यालयातून विद्यापीठ रोडने ब्रेमन चौक, औंध रोडने स्पायसर कॉलेज, बोपोडी चौकमार्गे शहरातील विविध भागातून फिरून सिमला आॅफिस चौकातून पुन्हा पोलीस मुख्यालय अशी ३६ किलोमीटरची ही रॅली आहे़ ९ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून २३ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़ सायकल रॅली, ज्येष्ठ नागरिकांकरीता वाहतूकीबाबत प्रबोधन, पीएमपी बसचालकांना प्रशिक्षण व जनजागृती, सर्व शाळांचे स्कुल बसचालक, मालक यांना सीएनजी किटची देखभाल कशी करावी, याविषयी प्रशिक्षण, वत्कृत्व स्पर्धा, सार्वजनिक वाहतूकीचा वापर यावर चर्चासत्र, पथनाट्य स्पर्धा, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव मार्गदर्शन, वाहतूकीच्या विषयावर स्टुडंट पार्लमेंट असे कार्यक्रम होणार आहेत़ (प्रतिनिधी)
पोलिसांकडून हेल्मेट जनजागृती
By admin | Updated: January 11, 2017 03:54 IST