पुणे : महापालिका निवडणुकीत यंदा आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरायला आहे़ हा फॉर्म अतिशय किचकट असल्याचे बोलले जाते़ पक्षाचे तिकीट मिळवायचे, प्रचार करायला वेळ मिळत नाही़ त्यात हा किचकट फॉर्म भरण्याचे काम उमेदवारांना करावे लागणार आहे़ ही संधी साधून अनेक जण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मदतीला सरसावले आहेत़ प्रामुख्याने टायपिंग सेंटर, कोर्टासंबंधी कामे करणाऱ्या व्यवसायिकांनी ही संधी साधली आहे़ महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत़ त्यात अनेक नगरसेवकांच्या पत्नी इच्छुक आहेत़ त्यातील बहुतेकांना आॅनलाईनची माहिती नाही़ त्यामुळे या सेंटरनी वेबसाईटवरून हा फॉर्म डाऊनलोड करून घेतला आहे़ उमेदवार त्यांच्याकडे गेला, की त्याच्याकडून ते हा फॉर्म त्याच्या अक्षरात भरुन घेणाऱ त्यानंतर ते आॅनलाईन हा फॉर्म भरणार आहेत़ यासाठी सुमारे अडीच तास लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते़ त्यासाठी चांगली रक्कम त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे़ आघाडीची बोलणी सुरू असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी याद्या रखडल्या आहेत़ तर, भाजपा आणि शिवसेनेच्या याद्या तयार असल्या तरी त्या सोमवारी सर्वच उमेदवार जाहीर करतील, असे नाही़ त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरावा लागणार आहे़ साहजिकच त्यांची घाई होणार असल्याने ते अशा मदतीला सरसावलेल्यांची मदत घेण्याची शक्यता आहे़ - उमेदवारीचा हा फॉर्म १० पानी असून त्यात अनेक बाबीची विचारणा करण्यात आली आहे़ त्यातच हा फॉर्म आॅनलाईन भरायचा असल्याने उमेदवारांना अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे़ अनेक जणांनी आजवर असा आॅनलाईन फॉर्म भरलेला नाही़
अर्ज भरण्यासाठी मदतीला व्यावसायिक
By admin | Updated: January 31, 2017 04:18 IST