लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बाजार आवारात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याएवढीच स्थिर असली तरी मागणी वाढल्याने भेंडी, टोमॅटो, मटार आणि पावट्याच्या दरामध्ये १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
पुण्यातील गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.७) रोजी ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून
आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ९ ते १० टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक गुजरात आणि आंध्रप्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मटार १३ ते १४ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरामधून ९ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १५०० ते १६०० गोणी, कोबी सुमारे ७ ते ८ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ७ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, भुईमुग शेंगा ५० ते ५५ पोती, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांदा ८० ट्रक इतकी आवक झाली.
--
भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर
कांदा २५-३५ ३५-४५
बटाटा ०८-१६ २०-३५
टोमॅटो ०८-१२ १५-२०
भेंडी ३०-४५ ४०-५०
गवार ३५-४० ४०-५०
मिरची ३५-५५ ४५-६०
कोथिंंबीर ०७-१० १०-१५
मेथी ०७-०८ १०-१५
मटार २५-२६ ४०-५०
गाजर १५-१८ २०-२५
--
कोथिंबीर, मेथी, मुळा, पालकचे दर उतरले
मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक आणि हरभरागड्डीच्या दरात घट झाली. तर चाकवत, करडई, पुदीना, अंबाडी, राजगिरा, चुका आणि चवळईच्या दरात वाढ झाली आहे. तर शेपूचे दर मात्र स्थिर होते.
रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची मेथीची ६० हजार जुड्यांची तर हरभ-याची २५ हजार गड्डींची आवक झाली. कोथिंबीर, मेथी, पालक, हरभऱ्याच्या जुडीमागे १ रुपये, कांदापात आणि मुळ्याच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली. तर चवळई चुका आणि चाकवतच्या दरात तीन रुपये, करडई, पुदीना, अंबाडी आणि राजगि-याच्या दरात जुडीमागे एक रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.