वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात दहा-बारा वर्षांनंतर सर्वात उच्चांकी तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४२ वर अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वत्र पिके जळून खाक होताना दिसत आहेत. सध्या इंदापूर तालुक्यात हिरवा चारा म्हणून मकापिकाला पसंती दर्शविली जात आहे. मका उत्पादनापेक्षा मक्याच्या चाऱ्याला जास्त भाव येत १६०० रुपये गुंठा चढाओढीने घेतला जात आहे.पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून हिरवा चारा मिळणे कठीण झालेले आहे. हिरवा चारा मिळविण्यासाठी जोडधंदा व्यावसायिक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यात दुग्ध व्यावसायिक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होत नसल्याने दूध उत्पादनात निम्मा परिणाम झालेला दिसत आहे. पाणीपुरवठा योग्य असणाऱ्या शेतकऱ्याने मका घेतल्याने मक्याच्या चाऱ्याला सोन्याचा भाव येऊन तीन महिन्यांत एकराला ६५ हजार रुपये उत्पादन मिळत असल्याने मका चारा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहेत.इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील असंख्य शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. रानात हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे चढ्या भावाने विकत घेण्याची वेळ आलेली आहे. हिरवा चारा जनावरांना मिळत नसल्याने दुधावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने निवडलेला दुग्धव्यवसाय अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)
हिरव्या मक्याला मिळतोय १ हजार ६०० रुपये भाव
By admin | Updated: April 23, 2017 04:12 IST