दौंड / इंदापूर : खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या पाण्याची चोरी होऊन नये म्हणून पाटबंधारे विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एकूण ३२ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.धरणातून दौंड आणि इंदापूरला आज मध्यरात्री पाणी सोडण्यात आले आहे. साधारणत: हे पाणी रविवारी दौंडच्या तलावात पोहोचेल, असा अंदाज दौंड नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी अभिमन्यू येळवंडे यांनी सांगितला.पाणी सर्वांत प्रथम पोलीस आणि पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात इंदापूरकडे जाणार असून, इंदापूरचा तलाव भरल्यानंतर हे पाणी परतीच्या मार्गाने दौंडच्या तलावात येणार आहे. सध्या दौंडच्या तलावात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तलावाची पाणीसाठवण क्षमता ७५0 एमएलटी आहे. तलाव भरल्यानंतर हे पाणी साधारणत: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज येळवंडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तलाव जरी भरला तरी दौंडला एक दिवसाआडच पाणीपुरवठा होणार आहे. शहराला साधारणत: ५ लाख लिटर प्रतिदिनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची टंचाई लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत १ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सोनवडी, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, लिंगाळी या ग्रामपंचायतींना नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असतो. मात्र, दुष्काळी परिस्थिती पाहता वरील गावांचा पाणीपुरवठा सध्या बंद केलेला आहे. पाण्यामुळे मोठा दिलासा इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ टीएमसी पाणी देऊन येथील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे बापट हे केवळ पुण्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे मत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.आवाज उठविला म्हणून न्याय शहराला पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणी सोडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, राहुल कुल यांनी यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली. विधानसभेतही त्यांनी दौंडच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला. त्यानुसार दौंडसाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार राहुल कुल यांच्या कामगिरीबाबत नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
पाणीचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची फौज
By admin | Updated: May 5, 2016 04:32 IST