पुणे : विश्व मराठी परिषदेने विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. दि. २८ ते ३१ असे ४ दिवसांचे असून हे विश्व मराठी वाणी या यूट्युब चॅनेलवर लाईव्ह होणार आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
गुरुवारी (दि.७) पत्रकार परिषदेत संमेलनाच्या तयारी विषयी माहिती देण्यात आली. परिषदेचे संस्थापक-संचालक अनिल कुलकर्णी, क्षितीज पाटुकले, स्वागताध्यक्ष (भारत) लीना सोहोनी, राज पाटील (केनिया), संमेलनाध्यक्ष (भारत) भारत सासणे, युवा संमेलनाध्यक्ष उमेद झिरपे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शीर्ष संगीताचे उदघाटन सोहोनी यांच्या हस्ते तर पोवड्याचे ऑनलाइन उदघाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाटुकले यांनी सांगितले की, संमेलन साहित्य केंद्री न राहता साहित्य, संस्कृती, उद्योजकता, युवा अशा ४ भागात असणार आहे. एका अध्यक्षा ऐवजी ९ जणांचे अध्यक्षीय मंडळ असा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. तसेच संमेलनाच्या इतिहासात प्रथमच शेतकरी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. www.sammelan.vmparishad.org या वेबसाईटवर मोफत नोंदणी करण्याचे आवाहन केले. तर www.youtube.com/VishwaMarathiVani यावर संमेलन पाहता येईल.