उरुळी कांचन : ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन येथील पोस्टाने १८ लाख बदलून दिले, तर नागरिकांनी पोस्टात असलेल्या बचत खात्यात सुमारे २५ लाख जमा केले असल्याची माहिती सब पोस्टमास्तर राजेंद्र देशपांडे व सहायक नामदेव महाडिक यांनी दिली.दि. ९ आॅक्टोबर २०१६ रोजी नोटा बदलून देण्याचा आदेश केंद्र सरकारने पोस्ट खात्याला व राष्ट्रीयीकृत बँकांना दिल्यानंतर या आस्थापनाच्या बाहेर सर्वसामान्य नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावून एकच गर्दी केली. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या २००० रुपयांच्या नवीन नोटा ४००० रुपयांपर्यंत पोस्टाने फोटो, ओळखपत्र पुरावा व आवेदन पत्र भरून घेऊन बदलून देण्याची सेवा विनातक्रार उरुळी कांचन पोस्टातील कर्मचाऱ्यांनी जनतेला दिल्याने या ठिकाणी चांगलीच गर्दी होऊ लागल्याची माहिती सब पोस्टमास्तर राजेंद्र देशपांडे यांनी दिली.आजपर्यंत सुमारे १८ लाख रुपये बदलून देताना प्रयागधाम हॉस्पिटल व निसर्गोपचार आश्रमातील रुग्णांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.आज रविवार सुटीचा दिवस असल्याने नागरिकांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच पोस्टाच्या दारात मोठी रंग लावली होती. त्यातील सुमारे १३० नागरिकांना सकाळी ९ ते ११ या वेळात ४ लाख रुपये बदलून दिले. उरुळी कांचनचा रविवार हा बाजारचा दिवस, पण जुन्या नोटा बदलून घेण्याच्या धावपळीत नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट दिसत होता.
पोस्टाने १८ लाखांच्या दिल्या बदली नोटा
By admin | Updated: November 14, 2016 02:16 IST