पुणे : महापालिका निवडणुकीसाठी ४ सदस्यांचा प्रभाग केल्याने त्याला जणू मिनी विधानसभेचे स्वरूप आले आहे़ त्यात विद्यमान नगरसेवक, नगरसेविकांचा गेल्या ५ वर्षांत कोणताही संपर्क नसलेला भागही त्यांच्या प्रभागात आला आहे़ त्यामुळे सर्व भागांना न्याय मिळेल व एकमेकांना साहाय्यभूत ठरतील, अशा विभागातील उमेदवारांचे पॅनेल तयार करण्याकडे सर्व पक्षांचे लक्ष असणार आहे़ मात्र, दोनचा प्रभाग असताना त्यात दोन वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यावर गेल्या पाच वर्षांत त्यांच्यात कामे करण्यावरून अनेक वादविवाद झाले़ आपल्या भागात दुसऱ्या नगरसेवकाने काही काम सुरू केले तर त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडवली गेली़ आता नव्या ४ च्या प्रभागात सर्व अथवा अधिक एकाच भागातून निवडून आले तर, इतर भागातील कामे हे नगरसेवक करणार का आणि कोणी तसा प्रयत्न केला तर उरलेले तिघे त्याला प्रतिसाद देतील का, असा प्रश्न कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात उभा राहिला आहे़ त्यातून या प्रभागाच्या रचनेवर नागरिकांनीच आक्षेप घ्यावा, असे व्हॉट्सअॅप सुरू झाले आहेत़ तीन तुकडे जोडल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक ७ ची रचना करण्यात आली आहे़ त्यातील गोखलेनगर, पुणे विद्यापीठ आणि पाटील इस्टेट व परिसर असे हे तीन विभाग आहेत़ त्या तीनपैकी कोणत्याही एका भागातील उमेदवार निवडून आले तर ते उरलेल्या दोन भागाकडे लक्ष देणार का? असाच प्रकार प्रभाग क्रमांक १४ मध्येही होण्याची शक्यता आहे़ निवडणुकीनंतर दुसऱ्या भागातील नागरिकांना त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होईल का?, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत़ प्रभागरचनेला आक्षेप घेण्यासाठी नागरिकांच्या गटांनीच पुढाकार घ्यावा, असे सूचविले जात आहे़
प्रभागातील विकासकामांत दुजाभाव होण्याची शक्यता
By admin | Updated: October 10, 2016 01:39 IST