पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता सुरू झालेले मतदान काही मतदान केंद्रांमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहिले. तब्बल साडेतेरा तास मतदानाची प्रक्रिया चालली. शहरातील साडेतीन हजार मतदान यंत्रांपैकी केवळ ३ युनिट व ९ बॅलेट मशीनलाच तांत्रिक अडचण निर्माण झाली. महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही वेळ निश्चित करण्यात आली होती. नियमानुसार सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण करून घेतले जाते. मतदान संपत आले असताना बोपोडी व हडपसर येथील मतदान केंद्रांमध्ये मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथील केंद्रांवरचे मतदान हे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहिले. शहरामध्ये साडेतीन हजार मतदान केंद्रापैकी फक्त ३ युनिट व ९ बॅलेट मशीनमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. मात्र तातडीने ते मशीन बदलण्यात आले अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. २४ लाख मतदारांपैकी ७५ टक्के मतदारांपर्यंत मतदानाच्या स्लिपा पोहोचविण्यात आल्याचा दावा कुमार यांनी केला. (प्रतिनिधी)मतदान यंत्राच्या पूजेचा अहवाल मागविलामुंढवा येथे माजी महापौर चंचला कोद्रे व माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी मतदान यंत्राची पुजा करण्यात आल्याचे फोटो व्हॉटस अॅपवरून व्हायरल झाले होते. याबाबत महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित घटनेची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आॅनलाइन सुविधेचा १० लाखांवर लोकांना लाभमहापालिकेच्या वतीने मतदारांना मतदान केंद्र व बूथ क्रमांक शोधून देण्यासाठी आॅनलाइन सर्च तसेच अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा १० लाख ६७ हजार ३६७ मतदारांनी लाभ घेतला. त्याचबरोबर कॉल सेंटरच्या माध्यमातूनही मतदान केंद्र शोधून देण्यात आले. या सुविधेचा लाभ ३४ हजार ७८७ जणांनी घेतला. आचारसंहिताभंगाच्या १०९ तक्रारीमहापालिकेच्या आचारसंहिता कक्षाकडे एकूण १०९ तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी ९८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर १९ तक्रारी प्रलंबित आहेत. आचारसंहितेच्या काळात सर्व निवडणूक कार्यालय मिळून ११ हजार ८२९ फ्लेक्स, बॅनर्स, झेंडे काढण्यात आले.
रात्री नऊ वाजेपर्यंत चालले मतदान
By admin | Updated: February 22, 2017 03:33 IST