पिंपरी : अपहरणकर्त्यांनी मला पळवून नेले असून, सात लाख रुपयांची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास माझ्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी त्यांनी दिली आहे, असे अपहरण झालेल्या १८ वर्षांच्या मुलाने स्वत: वडिलांना फोन करून सांगितले. वडिलांनी थेट वाकड पोलिसांकडे खंडणीसाठी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली. कोणीही अपहरण केले नसून, हा त्या मुलाचा बनाव असल्याचा खरा प्रकार चव्हाट्यावर आला.आजी-आजोबांची आठवण झाली, म्हणून घरात कोणालाही न सांगता १८ वर्षांचा तरुण लातूरला आजी-आजोबांकडे गेला. चार दिवस तेथे राहिल्यानंतर पुन्हा घरी गेल्यास वडिलांना काय सांगायचे? न सांगता चार दिवस बाहेर काढल्यामुळे वडील रागावणार, ही भीती मनात असल्याने यातून सुटका करण्यासाठी खोटे काही तरी कारण सांगून मोकळे व्हावे, असा विचार करून त्याने वडिलांना आपले अपहरण झाल्याचे फोनवरून कळविले. एवढेच नव्हे, तर चार अज्ञात व्यक्तींनी थेरगाव, डांगे चौकातून पळवून नेले असून, सात लाख रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम त्यांना न पोहोचल्यास माझ्या जिवाचे ते काही बरे-वाईट करतील, असेही त्याने वडिलांना कळविले. अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडलेला मुलगा स्वत:च फोनवरून ही माहिती देत असल्याने वडिलांना त्याची काळजी वाटली. वेळ दवडण्यापेक्षा काही तरी हालचाली करणे आवश्यक आहे, या अनुषंगाने त्यांनी थेट वाकड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना त्यांनी घडलेली हकिकत सांगितली. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, गणेश माळी, प्रशांत पवार, संजय काळोखे, प्रमोद मगर, रमेश गरुड, सचिन अहिवळे, नीलेश देसाई यांनी अपहरणाचा बनाव उघडकीस आणला. (प्रतिनिधी)वाकड पोलीस आणि खंडणीविरोधी पथक यांनी समांतर तपास सुरू केला. अपहरण झालेल्या तरुणाच्या वडिलांना खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी बरोबर घेतले. त्यांना योग्य त्या सूचना देऊन अपहरणकर्त्यांशी मोबाइलवर बोलण्यास सांगितले. मुलाला पुण्यात येण्यास भाग पाडले. मुलगा पुण्यात येताच, खंडणीविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, अपहरण झाले नाही. घरात न सांगता लातूरला गेल्यामुळे वडील रागावतील. त्यांचा राग कमी व्हावा, या उद्देशाने अपहरण झाल्याचे वडिलांना खोटे सांगितले, अशी कबुली त्या तरुणाने दिली. वडील रागावतील म्हणून तरुणाने केलेल्या या प्रतापामुळे पोलिसांना मात्र नाहक धावपळ करावी लागली. त्या तरुणास पुढील कार्यवाहीसाठी वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बनावामुळे पोलिसांची धावपळ
By admin | Updated: May 25, 2016 04:42 IST