लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : चित्रपटांमध्ये पाहून एक प्रतिमा मनात तयार केली जाते; पण पोलीस जसे वाटतात तसे प्रत्यक्षात नसतात. पोलिसांकडे समाजाकडून ‘माणूस’ म्हणून पाहिले जात नसल्याची खंत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केली. तुम्ही जर पोलिसांना माणुसकीची वागणूक दिलीत, तर तुमच्या प्रत्येक कामासाठी ते तत्पर असतील. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाच्या प्रत्येक कसोटीवर आम्ही खरे उतरण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांतील हस्तगत वस्तूंचा पुन:प्रदानाचा कार्यक्रम शहर पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. ७२ गुन्ह्यामतील फिर्यादींना १ किलो ७५३.४ ग्रॅम सोन्याचे दागिने व २२३०.२२ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ४५ लाख ३७ हजार ७४३ रुपये किमतीच्या मुद्देमालाचे वितरण करण्यात आले.शुक्ला म्हणाल्या, ‘‘गुन्ह्याचा तपास करताना कदाचित वेळ लागू शकतो; पण पोलिसांवर विश्वास हवा. शेवटी प्रत्येकाकडून चुका होत असतात. पोलिसांना माणुसकीची वागणूक द्यायला हवी. ते स्वत:चे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून तुमच्यासाठी अहोरात्र झटत असतात हे कायम लक्षात ठेवा.’’ प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभार मानले.
पोलिसांकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही
By admin | Updated: June 29, 2017 03:49 IST