पुणे : पोलिसांनी केलेल्या बंदोबस्ताच्या आणि शहरातील सर्वच मतदार संघांमधील गस्तीच्या उपाययोजनांमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत तसेच शांततेत पार पडली. मतमोजणीदिवशी मतमोजणी केंद्रांसोबतच शहरात कुठेही अनुचित प्रकार न घडल्यामुळे पोलिसांनीही सुस्कारा सोडला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मतमोजणीचे निकाल जवळपास एकतर्फीच लागल्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने तशीही डोकेदुखी कमी झालेली होती. भाजपासोबत अन्य पक्षांच्या उमेदवारांची फारशी लढतच न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये होणारी संभाव्य भांडणे, कुरबुरी, वादविवाद टळले. दुपारी बारापर्यंत जवळपास सर्व निकालांचे अंदाज आल्यानंतर परिस्थिती ओळखून पोलीसही थोडेसे निवांत झाले होते. मतमोजणी केंद्राजवळ तर केवळ भाजपाचा मेळावा असल्यासारखे चित्र झाल्यामुळे पोलिसांना फारसे श्रम पडले नाहीत. पोलीस आयुक्त सतीश माथुर, सह पोलीस आयुक्त संजय कुमार, अतिरिक्त आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, प्रकाश मुत्याळ, डॉ. शहाजी सोळुंके, अब्दुर रहमान यांच्यासह उपायुक्त सारंग आवाड, डॉ. सुधाकर पठारे, एम. बी. तांबडे, मनोज पाटील, जयंत नाईकनवरे, तुषार दोषी यांनी बंदोबस्तात भाग घेतला होता. गुन्हे शाखेसह शहर पोलीस दलातील सर्वच सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांना बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली होती. रविवारी रात्री आणि सोमवारी निघणाऱ्या विजयी मिरवणुकांवेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. दोन गटांमध्ये उडणारे खटके थोपविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.(प्रतिनिधी)
पोलिसांनी सोडला नि:श्वास
By admin | Updated: October 19, 2014 23:04 IST