लोणावळा : शहराच्या उत्तरेला कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजमाची किल्ला व परिसरात दारु व हुक्का पार्ट्या करणाऱ्या पर्यटकांचा शनिवारी रात्री दुर्गविजय मावळ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश करत दारुच्या बाटल्या, हुक्का साहित्य व पार्टीचे फोटो कामशेत पोलिसांना दिले आहेत. अलीकडे राजमाची किल्ला परिसर मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे. मुंबई,पुण्यासह मावळ परिसरातील अनेक मंडळी खास मद्य व मांसाहाराचा बेत आखण्यासाठी राजमाची किल्ला व परिसरात जातात. लोणावळा शहरापासून १६ किमी अंतरावर हा किल्ला असून जाण्यासाठी खासगी वाहने वगळता कसलीही सुविधा उपलब्ध नाही. एकांताचा फायदा घेत मद्यपी पार्ट्यासाठी राजमाची किल्ला परिसराला पसंती देतात. येथील स्थानिकांनादेखील यामधून चांगला रोजगार मिळत असल्याने स्थानिकदेखील या पार्ट्यांना खतपाणी घालत आहेत. खरे तर राजमाची गावात दारुबंदीचा ठराव करण्यात आला आहे. ही दारुबंदी केवळ कागदावरच असल्याचे या प्रकरणांवरुन दिसून येत आहे.शनिवारी (दि. २१) रात्री मुंबई, पुणे परिसरातील काही मुले व मुली किल्ला परिसरात मद्य व हुक्का पार्टी करण्यासाठी येणार असल्याची कुणकुण दुर्गविजय मावळ या दुर्गप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली होती. त्यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाणे, भारतीय पुरातत्त्व विभाग व स्थानिकांना कल्पना दिली होती, असे संघटनेचे कार्यकर्ते शिवप्रसाद सुतार यांचे म्हणणे आहे. मात्र, यापैकी कोणीच या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले नाही. (वार्ताहर)
हुक्का पार्टी करणारे पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: January 23, 2017 03:00 IST