पुणे : दहावीच्या परीक्षेच्या बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस हवालदाराने वैयक्तिक कारणातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास प्रभात रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये घडली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच ही घटना घडल्यामुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आदमअली चाँद शेख (वय ४४, रा. पोलीस वसाहत, सोमवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख ९ डिसेंबर १९८० रोजी पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती झाले होते. त्यांनी यापूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात काम केले होते. सध्या ते पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. त्यांना दहावीच्या परीक्षेचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये त्यांची ड्युटी होती. शाळेच्या पेपर ठेवण्याच्या स्ट्राँग रुमशेजारील एका छोट्या खोलीमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होती. शाळेच्या सुरक्षारक्षक जयश्री उत्तम झेंडे यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उठल्यावर साडेआठच्या सुमारास शेख बाहेर जाऊन चहा पिऊ न आले. त्यांची मोटारसायकल स्वच्छ करुन ते खोलीबाहेर बसलेले होते. साधारणपणे नऊच्या सुमारास शेख खोलीमध्ये गेले. तेथील खुर्चीवर बसून त्यांनी एसएलआर (सेल्फ लोडिंग रायफल) बंदूक स्वत:च्या हनुवटीखाली धरली. बंदुकीचा चाप ओढून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हनुवटी खालून घुसलेली गोळी डोक्यामधून बाहेर येत छताला धडकून पुन्हा जमिनीवर आदळली. दिवसपाळी असलेले पोलीस हवालदार कृष्णा गायकवाड हे शेख यांना सोडण्यासाठी आले. गाडी लावून खोलीमध्ये गेले असता त्यांना शेख रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी शाळेचा सुरक्षारक्षक असलेल्या भट यांच्यासह समोरच्या डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी घटनास्थळाला भेट दिली. शेख यांचा मृतदेह विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. (प्रतिनिधी)४शेख यांच्यावर २०१० मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शेख मधल्या काळामध्ये निलंबित होते. निलंबन मागे घेतल्यावर ७ एप्रिल २०१४ रोजी ते पुन्हा सेवेत हजर झाले होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील भोई शिरवळ आहे. त्यांच्या मागे पत्नी कुरेशा, मुलगा शोएब (वय २२) आणि मुलगी असा परिवार आहे. ४राज्यात गेल्या चार वर्षांत १२९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कौटुंबिक समस्या, ताणतणाव, आजारपण, व्यसनाधिनता आदी कारणांमधून झालेल्या या आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण मुंबई, नागपूर आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आहे.
पोलीस हवालदाराची आत्महत्या
By admin | Updated: March 7, 2015 00:17 IST