पुणे : फेसबुकवर अश्लील मजकूर प्रसिद्ध करून एका तरुणीला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सुमत ऊर्फ सुमीत सरगरा (रा. प्रगतीनगर, नालासोपारा, ईस्ट मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ही घटना आॅक्टोबर २०१४ ते ५ जानेवारी २०१५ यादरम्यान घडली. आरोपी व त्याचे मित्र हे फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून शिवीगाळ करीत.फिर्यादीच्या दोन मुलींना उचलून नेण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देऊन तसेच फिर्यादीच्या फेसबुकवर एका नग्न महिलेचा फोटो व अश्लील मजकूर टाकला व इतरही लोकांना फिर्यादी हिच्याशी अश्लील बोलण्यास व लैंगिक संबंधांची मागणी करण्यासाठी प्रोत्साहित केले. आरोपीकडे फेसबुक अकाऊंटबाबत चौकशी करून माहिती प्राप्त करायची आहे. फिर्यादीबाबत प्रसिद्ध केलेला बदनामीकारक, अश्लील मजकूर व मोबाईल नंबरची पोस्ट नष्ट करणे आवश्यक आहे. इतर साथीदारांची मदत घेतली आहे का, याचा तपास करायचा आहे. आरोपीकडील संगणकीय साहित्य, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे का, याचा तपास करण्यासाठी आारेपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)
फेसबुकवर अश्लील मजकूर टाकणाऱ्याला पोलीस कोठडी
By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST