पुणे : पीएमपीएमएलच्या सर्व बसेसला जीपीएस ट्रॅकिंग अँड मॉनिटोरिंग प्रणाली बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा सध्या केवळ बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बसेसला बसविण्यात आली आहे. सुमारे ७९० बसेसला ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात सर्व बसेसला ही यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या येत्या ३१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमलच्या तब्बल २ हजार ६० बसेस दररोज संचलनात आहेत. या बसेसवर नियंत्रण ठेवणे तसेच संचलनावर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त आहे. तसेच या प्रणालीमुळे पीएमपीच्या वेगवेगळया मार्गांच्या संचलनांची माहिती संकलित करून त्यात सुधारणा करणे शक्य होईल. या शिवाय, अनावश्यक बसमार्गांची संख्या लक्षात आल्यास ते कमी-जास्त करता येणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने बसेसमध्ये ही यंत्रणा लावण्याची निविदाप्रक्रिया राबविणे, कार्यादेश देणे, करारनामा करणे यासाठीच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
पीएमपीच्या सर्व बसला जीपीएस प्रणाली
By admin | Updated: October 28, 2015 01:36 IST