पुणे : शहरातील महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र १०० महिला स्पेशल बस सुरू करण्याची पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) घोषणा हवेत विरली आहे. अनेक बस दुरूस्तीअभावी गॅरेजमध्येच बंद असल्याने नियमित गाड्यांचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे महिला स्पेशल बस सुरू करणे सध्या तरी शक्य होणार नसल्याची चिन्हे आहेत. बसमधील गर्दीतून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अनेक तक्रारी केल्या जातात. काही पुरूष प्रवाशांकडून या गर्दीचा गैरफायदा घेतला जातो. तसेच बसमध्ये बसण्यावरूनही अनेकदा पुरूषांशी वादावादीचे प्रसंग घडले आहेत. या काही प्रमुख मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र बसेस सुरू करण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला होता. संचालक प्रशांत जगताप यांनी १ जुलैच्या मुहूर्तावर महिलांसाठी १०० स्पेशल बसेस सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र या मुहूर्ताला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्या तरी १०० पैकी अद्याप एकही महिला स्पेशल बस रस्त्यावर धावू शकलेली नाही. त्यामुळे ‘पीएमपी’ची ही घोषणा सध्यातरी हवेतच विरल्याचे चित्र आहे. सध्या हडपसर ते स्वारगेट व कोथरूड ते महापालिका या मार्गावर महिला स्पेशल बस धावतात. मात्र त्यांच्या फेऱ्यांची संख्याही कमी आहे. तसेच धायरी ते स्वारगेट व कात्रज ते स्वारगेट या मार्गावरही बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र नियमित बसचा तुटवडा जाणवू लागल्याने या मार्गावरील या फेऱ्या बंद केल्या. सध्या पीएमपीकडे स्वत: सुमारे १२७५ तर ठेकेदाराच्या ६८० बस आहेत. त्यापैकी सुमारे १३२५ बस दररोज मार्गावर धावतात. तर विविध कारणांमुळे सुमारे ६५० गॅरेजमध्येच उभ्या असतात. त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्यातही अनेक अडचणी येतात. (प्रतिनिधी)
‘पीएमपी’ची महिला स्पेशल रखडली
By admin | Updated: August 13, 2014 04:36 IST