पुणे : सात महिन्यांपासून पुणे महागनर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पूर्णवेळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिळालेले नाहीत. ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, बिघडलेले नियोजन, सुट्या भागांची कमतरता अशा समस्यांचा सामना पीएमपीला करावा लागत आहे. तसेच सध्या सुरू असलेली नोकरभरती, नवीन बसखरेदी, प्रस्तावित बीआरटी मार्ग, बिझनेस प्लॅन अशा विविध नवीन बाबींचे नियोजन करण्यासाठी पूर्णवेळ ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी असावा, अशी चर्चा आहे.राज्य सरकारने ‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची मागील वर्षी जुलै महिन्याच्या सुरूवातीला नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यानंतर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला. आॅगस्ट महिन्यात त्यावेळचे धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, नियुक्ती झाल्यापासून ते पुण्यात फिरकलेही नाहीत. या नियुक्तीबद्दल नाखुश असल्याचे जाणवल्यानंतर राज्य सरकारनेही त्यांचीही बदली केली. पण त्यावेळी पीएमपीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्यापासून कुणाल कुमार यांनाच पीएमपीचा भार पेलावा लागत आहे. मिसाळ यांच्या बदलीनंतर राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे सात महिन्यांपासून पीएमपीला पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही.पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडील पालिकेचे दैनंदिन कामकाज, स्मार्ट सिटी, मेट्रो अशा विविध योजनांच्या कामांचा मोठा व्याप आहे. तसेच सध्या निवडणुकांमुळे त्यात आणखी भरच पडली आहे. त्यातून काही प्रमाणात ते ‘पीएमपी’च्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. काही दिवसांत नवीन बसची खरेदी होणार आहे. त्यासाठी सुमारे ८ हजार जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
पीएमपी अधांतरी
By admin | Updated: February 10, 2017 03:27 IST