पुणे : बढतीसाठी कर्मचाऱ्यांकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) संचालक अभिषेक कृष्णा यांनी मंगळवारी संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ पाहून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे लवकरच उघडकीस येतील अशी अपेक्षा आहे.पीएमपीतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बढती किंवा इतर कारणांसाठी पैसे घेत असल्याची चर्चा होती. त्यानुसार लोकमत प्रतिनिधीने एका कर्मचाऱ्याचे स्टींग आॅपरेशनद्वारे हा प्रकार समोर आणला. सोमवारी ‘बढतीसाठी अधिकाऱ्यांकडून लाच’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पीएमपीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. याबाबत पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी पुरावे दिल्यास कारवाई करू, असे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने संबंंधित स्टींग आॅपरेशनचा व्हिडिओ कृष्णा यांना दाखविला. त्याआधारे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.चौकशीमध्ये लाच घेणारा अधिकारी तसेच त्यांचे सहकारी पुढे येणार आहेत. सध्या केवळ एकाच कर्मचाऱ्याने पैसे दिल्याचे पुढे आले आहे. परंतु या कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याने आणखी काही कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी झाल्यास बढती तसेच कारवाई शिथिल करण्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येऊू शकते. यात आणखी काही अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पीएमपी लाचखोरीच्या प्रकरणाची होणार चौकशी
By admin | Updated: July 15, 2015 01:50 IST