बेल्हा : येथील गारमळा पिंपळझाप शिवारात एक नर जातीचा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटेच्या जेरबंद झाला. येथील शिंदेमळा, गारमळा व पिंपळझाप परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या ग्रामस्थांना दिसत होता. तसेच पाळीव जनावरांवरही हल्ले सुरूच होते. गारमळा पिंपळझाप शिवारातील विजय घोडके यांच्या उसाच्या शेतात गट नं. २८ मध्ये वनखात्याने गेल्या ८ दिवसांपूर्वीच पिंजरा लावला होता. हा बिबट्या येथील लोकांना दिवसा रात्री कधीही दिसत होता. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थ रस्त्याने जाताना-येताना बिबट्याच्या भीतीने वावरत होते. यामुळे या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यात हा बिबट्या सकाळच्या सुमारास जेरबंद झाला. वनपाल जे. टी. भंडलकर व बजरंग केंद्रे पाहणीसाठी गेले असता त्यांना पिंजऱ्यांचे दार खाली पडलेले दिसले. त्यांनी पाहिले असता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वनपाल बजरंग केंद्रे व वनरक्षक जे. टी. भंडलकर यांनी पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे सांगितले. या ठिकाणी लगेचच दुसरा पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पिंपळझापला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By admin | Updated: October 8, 2016 00:48 IST