पिंपरी : महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४,६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरलेली नाहीत. या जागा अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने त्याचा महापालिकेच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होत आहे.
महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार एकूण ११ हजार ५१५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६ हजार ८६७ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्यास किमान २० ते २५ अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या जागेवर नोकरी भरती होत नसल्याने अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. आतापर्यंत तब्बल ४ हजार ६४८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांची जबाबदारी टाकली जात आहे.महापालिकेच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेले अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच काही अधिकारी निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. २००० पासून महापालिकेतून वर्ग एक ते चारमधील तब्बल ६ हजार १६३ अधिकारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, राजीनामा, निधन यामुळे शासनसेवेतून गेले आहेत.
नगर सचिव, उपनगर सचिवपद पाच महिन्यांपासून रिक्त
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगर सचिव उल्हास जगताप हे ३० जून २०२४ ला सेवानिवृत्त झाले. त्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर नगर सचिव पद भरणे आवश्यक होते. नव्या नगर सचिवाला ते कामकाज समजून घेता आले असते. मात्र, तसे न झाल्याने महापालिकेत सध्या नगर सचिव तसेच, उपनगर सचिव नाहीत. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे नगर सचिव पदाचा कार्यभार सोपविला आहे. वरिष्ठ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्या जागी पात्र अधिकाऱ्यांची किमान एक ते दोन महिने अगोदर नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत तातडीने हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेकडून ३६० पदांची नोकरभरती काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली. लिपिक आणि अभियंता पदावर रूजू झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अग्निशमन विभागाची विविध पदे भरली जात आहेत. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग