लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनास होणारा उशीर आता चालणार नाही. कारण, मुंबई येथील औद्योगिक न्यायालयाने प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना देय तारखेदिवशी म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन द्या, असा आदेश दिला आहे. तसेच जर न्यायालयाचा आदेश महामंडळाने पाळला नाही, तर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून पुन्हा न्यायालयात जाऊ, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
मागील काही दिवसापासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास दिरंगाई करीत आहेत. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या करून जीवन संपविले. अशा घटना वारंवार घडू लागल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने न्यायालयात धाव घेतली. त्या प्रकरणांवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ७ तारखेला वेतन देण्यात यावे, असे सांगितले आहे.
---------------------
न्यायालयाच्या ह्या निर्णयांमुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या संकटाच्या काळात राज्य सरकार एसटीच्या पाठीशी ठाम उभी राहिली पाहिजे.
संदीप शिंदे, अध्यक्ष , महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना