पुणे : विमा कंपन्या आणि रुग्णालये यांच्यामधील वादामुळे कॅशलेस विमा योजना बंद करण्यात आल्याने त्याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. कॅशलेस आरोग्य विमा काढूनही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पैसे भरावे लागत असल्याने रुग्ण तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलू लागले आहेत.उपचार, शस्त्रक्रियांच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विमा कंपन्यांनी एकत्र येत नवे दर गेल्यावर्षी जाहीर केले होते. हे दर छोट्या, मध्यम व मोठ्या रुग्णालयांसाठी वेगवेगळे आहेत. छोट्या व मध्यम रुग्णालयांसाठी देण्यात आलेले दर खूपच कमी असल्याने ते वाढवून देण्याची मागणी रुग्णालयांनी वेळोवेळी केली होती; मात्र त्याची दखल विमा कंपन्यांनी घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णालयांनी १ डिसेंबरपासून कॅशलेस सेवा पूर्णपणे बंद केली. याचा फटका विमाधारक रुग्णांना बसत आहे. या सगळ्या वादात रुग्ण भरडले जात असल्याने त्यावर तातडीने तोडगा निघावा, अशी मागणी विमाधारक रुग्णांकडून केली जात आहे.विम्याचे पैसे भरूनही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांना पैसे भरण्याची सक्ती रुग्णालयांकडून केली जात आहे. यात अनेक शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी पैशांची ताबडतोब जुळणी होत नसल्याने तातडीच्या वगळता इतर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया थोड्या उशिरा केल्या तर चालतील का, अशी विचारणा रुग्ण डॉक्टरांकडे करीत आहेत. त्यांचा होकार मिळताच शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत, अशी माहिती काही रुग्णालयांनी दिली.
कॅशलेस विमा नसल्याने रुग्णांची फरफट
By admin | Updated: January 10, 2015 00:39 IST