पुणे : “रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांना शालेय जीवनापासूनच शाळेतील अभ्यासापेक्षा इतिहासात रुची होती. लहान वयात त्यांनी ‘महाराष्ट्र कोकीळ’ नावाचे मासिक काढले होते. ऐतिहासिक विषयांमधील त्यांच्या कामामुळे त्यांना थोर इतिहास संशोधक म्हणून संबोधले गेले,” असे मत रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पारसनीस यांनी व्यक्त केले.
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ सुरेंद्र पारसनीस लिखित पारसनीस चरित्र व कार्य या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ते बोलत होते. समितीचे डॉ सुधांशू गोरे, विवेक कुलकर्णी, सुमती कुलकर्णी, डॉ रवींद्र पारसनीस, विपाशा पारसनीस आदी यावेळी उपस्थित होते. पारसनीस यांची नात सुमती कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
सुरेंद्र पारसनीस म्हणाले, “पारसनीस यांनी वयाच्या १७ व्या वर्षी किर्तीमंदिर नावाचे पुस्तक लिहिले. तर २४ व्या वर्षी ४६८ पानांचे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र लिहिले. त्यांची शिक्षणाची संधी हुकली तरी त्यांनी इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. त्यातूनच पुढे १५ खंड, ३० च्या वर पुस्तके, मासिके लिहिली.”