पुणे : खान्देशी मातीचा, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता जपत नाटक, साहित्य, संगीत आणि नृत्य क्षेत्रात सातत्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती व गंभीर स्वरूपाचे प्रयोगशील नाटक साकार करणारी ‘परिवर्तन जळगाव’ ही संस्था यंदाच्या वर्षी दशकपूर्ती साजरी करीत आहे. त्यानिमित्त प्रायोगिक स्तरावर परिवर्तनने निर्मित केलेल्या नाटकांसह सांगीतिक कार्यक्रमाची पर्वणी दि. ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ‘परिवर्तन कला महोत्सवा’त रसिकांना मिळणार आहे.
शुक्रवार पेठेतील ज्योत्सना भोळे सभागृहात नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात शंभू पाटील लिखित ‘अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने होणार आहे. हे वर्ष अमृता प्रीतम यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या अनुषंगाने परिवर्तनने या नाटकाची निर्मिती केली आहे. रविवारी (दि. ७) ‘हंस अकेला’ या सांगीतिक कार्यक्रमाने समारोप होईल. ज्योत्सना भोळे सभागृहात दररोज सायंकाळी ७ वा. हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.