सासवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवडचा दोन दिवसांचा मुक्काम आणि संत सोपानदेव आणि चांगा-वटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान यामुळे वारकरी आणि दर्शनाला आलेले भाविक, तसेच सोहळ््यानिमित्ताने आलेली विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तूंची दुकाने या सर्वांमुळे सासवड शहरात प्रचंड कचरा आणि घाण साठली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी सासवड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावत त्वरेने शहर साफ करण्याचा निर्णय घेऊन अमलातही आणला. दोन दिवसांच्या काळात सुमारे सत्तरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने २ ट्रॅक्टर, ५ बोलेरो गाड्या १ काँपॅक्टर आणि ६ ढकलगाड्यांच्या साह्याने सुमारे ३५ टनांहून अधिक कचरा उचलण्यात आल्याचे आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले. दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने सफाई कामाला मर्यादा येत होत्या. त्याही स्थितीत साफसफाईचे कामकाज सुरूच असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. माऊलींच्या पालखी सोहळाकाळात पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तळावर, तसेच बारशीच्या पंगती असल्याने तंबूतील पत्रावळ्या आणि अन्य कचरादेखील उचलण्यात आला. मुख्याधिकारी विनोद जळक, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपाध्यक्ष सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. पावसामुळे पावडर फवारणी केली नसली तरी लिक्विड जंतूनाशकाची फवारणी सर्वत्र करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आरोग्य विभागातील नीलेश भोंडे, बापू गायकवाड, विशाल पवार, राजू भोंडे व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही साफसफाई केली. आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी, चोपदार फाऊंडेशन आणि सासवड नगरपालिका यांच्या सहकार्यातून इनोव्हेटिव्ह क्लिनिंग सिस्टीम प्रा. लि. या संस्थेने शहरातील विविध ठिकाणी फवारणी करून निजंर्तुकीकरण मोहीम राबविली.
पालखी प्रस्थान होताच सासवड झाले चकाचक
By admin | Updated: July 4, 2016 01:51 IST