मागील आठ दिवसांपासून वातावरणातील बदलाचा अनुभव येत आहे. सुरुवातीला कडाक्याची थंडी पडली. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसा कडक उन व रात्री पाऊस व संमिश्र वातावरण असे विचित्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज पहाटे पासून पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज पहाटे पडलेले धुके सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कायम होते. हे धुके नगदी पिके तसेच फळबागांसाठी व भाजीपाला पिके विशेषता कांदा, बटाटा, धना, मेथी या भाजीपाला पिकांना नुकसानीचे ठरणार आहे.
याबाबत माहिती देताना महेश मोरे म्हणाले फळबागांमध्ये द्राक्ष पिकाचे धूक्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. तसेच आंबा पिकालाही फटका बसणार आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. दिवसा कडक उन पडत असल्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तुडतुडे, आळी यांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना तो रोखण्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागतील. कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. सातगाव पठार भागात ज्वारी पीक जोमदार आले होते. मात्र अवकाळी पडलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतातच आडवे झाले आहे. हे ज्वारी पीक हातातोंडाशी आले असता त्याचे नुकसान होऊन शेतकर्यांना मोठा फटका बसणार आहे.बुरशीजन्य रोग पिकावर पडू लागल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळी महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे भांडवली खर्चात वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब पिंगळे यांनी दिली. धूक्याचा प्रादुर्भाव दूर व्हावा अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
११ मंचर
११ मंचर १
धुके पडू लागल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.