पुणे : महापालिकेमध्ये बदल्यानंतरही आहे त्याच जागी राहण्याचा प्रकार सुरू असून, त्याचे लोण आता शिस्तप्रिय असणाऱ्या अग्निशामक दलातही पसरले आहे. अनेक वर्षांनी अग्निशामक दलातील केंद्रप्रमुखांच्या बदल्यांचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी काढले. मात्र, दोन अधिकारी वगळता इतर अधिकारी बदल्यांच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. शासकीय सेवा नियमावलीनुसार अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहून त्यांचे आर्थिक हितसंबंध तयार होऊ नयेत, याकरिता त्यांची साधारणत: दर ३ वर्षांनी बदली करण्यात यावी, अशी तरतूद आहे. पुणे महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तरतुदीचे पालन करण्यास नकार दिलेला आहे. अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे, समीर शेख, गजानन पाथ्रुडकर, साईबाबा जिल्हेवार, विजय भिलारे, प्रमोद सोनवणे यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच यापुढे दर वर्षी रोटेशन पद्धतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, असे त्या आदेशात नमूद करण्यात आले.प्रमोद सोनवणे हे येरवडा केंद्रात रुजू झाले आहेत. साईबाबा जिल्हेवार यांनीदेखील रुजू होत असल्याचे पत्र दिले आहे. मात्र, उर्वरित अधिकारी अद्याप रुजू झालेले नाहीत. अधिकाऱ्यांबरोबरच दलातील ५०० कर्मचारी किती दिवसांपासून कुठे कार्यरत आहेत,याचा तक्ता तयार करून त्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश राजेंद्र जगताप यांनी दिले होते. कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. महापालिकेच्या बांधकाम व पथ विभागातील अधिकाऱ्यांची बदली इतरत्र झाली, तर ते रुजू होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)मुख्य केंद्र सोडण्यास नकार४अग्निशामक दलाच्या भवानी पेठेतील मुख्य केंद्रातील ३ अधिकाऱ्यांची बदली केंद्रप्रमुख म्हणून दुसरीकडे करण्यात आली आहे. मात्र, ते रूजू झालेले नाहीत. मुख्य केंद्रात बांधकाम एनओसीची कामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यातूनच अधिकारी मुख्य केंद्र सोडण्यास तयार नसल्याची चर्चा अग्निशामक दलामध्ये रंगली आहे. स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, तसेच इतर राजकीय पदाधिकाऱ्यांकडून बदली रद्द करण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
आयुक्तांचा आदेश डावलून ‘मक्तेदारी’
By admin | Updated: March 19, 2015 00:23 IST