राजगुरुनगर : मोजणी होऊच देणार नाही, अशी ताठर भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मावळल्याने बाह्यवळणाचा मार्ग सुकर झाला आहे. मोजणी सुरू करण्यापूर्वी ‘शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ,’ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर, पुणे-नाशिक महामार्गाची बाह्यवळण मोजणी आज सुरू झाली. बाह्यवळणाच्या पहिल्या टप्प्यासाठी होलेवाडी, राक्षेवाडी, चांडोली, ढोरे-भांबूरवाडी या गावांची काही जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी संजय पाटील, महामार्ग विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक डी. एस. झोडगे, खेडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, भूमीअभिलेख उपनिरीक्षक सूरज कावळे, तहसीलदार प्रशांत आवटे, पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी आदी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या वतीने अनिल राक्षे, अशोक राक्षे, सतीश राक्षे, शांताराम चव्हाण, निवृत्ती होले, पांडुरंग होले, सुभाष होले आदींनी त्यांची भेट घेतली आणि आमचा बाह्यवळणाला विरोध असल्याने मोजणी करू नका अशी भूमिका घेतली; मात्र वरिष्ठांचे आदेश असल्याने मोजणी करणारच, अधिकाऱ्यांचा पवित्रा होता. त्यानंतर अनिल राक्षे यांनी, ‘आपल्याला कोर्टात जाण्याचा पर्याय खुला आहे’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पाचारण केले. जमिनींचे चांगले मूल्यमापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन संजय पाटील यांनी दिले. ‘हा ६० मीटर रुंदीचा महामार्ग होत असल्याने शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीची किंमत वाढणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मोजणीला सहकार्य करावे,’ असे पाटील म्हणाले. या बैठकीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात केली आणि राक्षेवाडीपर्यंत जमिनींची मोजणी केली. (वार्ताहर)हतबल शेतकरी : अधिकाऱ्यांचे मौन1‘मोजणी झाल्यावर शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी होईल आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होऊन शासनाकडे जमीन वर्ग केली जाईल,’ असे पाटील यांनी सांगितले. पूर्णपणे भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळा मोबदला द्यावा, अशी मागणी महिला करीत होत्या; पण त्यांना समाधानकारक उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. जमिनी गेल्यावर नातवांना कामच राहणार नाही म्हणून त्यांना नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी एक आजीबाई करीत होत्या; पण त्यांना समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते. आपल्या जमिनी जाणार, यामुळे शेतकरी हतबल झाले होते, त्यामुळे नुकसानभरपाई लगेच मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.2शेतकऱ्यांना रेडीरेकनर आणि अलीकडच्या काळात त्या भागात झालेले जमिनीचे व्यवहार यापैकी जी किंमत अधिक असेल, तो दर निश्चित करून, त्याच्या तिप्पट नुकसानभरपाई देण्यात येईल, असे पाटील आणि खराडे यांनी सांगितले. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या खातेफोड झाल्या नाहीत; मात्र वाटण्या झाल्या आहेत, त्यांना वाहिवाटीप्रमाणे नुकसानभरपाई मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या पिकांची नुकसानभरपाईही देण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी शेतक-यांना दिली. शेतक-यांनी समजुदारपणाची भूमीका घेत मोजणीच्या कामाला सहकार्य केले.
बाह्यवळणाचा विरोध मावळला
By admin | Updated: November 8, 2015 03:00 IST