लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग इंदापूर तालुक्यातील बागायती भागातील १३ गावांतून जाणार आहे. परंतु हा प्रकल्प पूर्णपणे बागायती भागातून जाणार असल्याने या भागातील अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार असून शेती व्यवसाय कोलमडणार आहे. यामुळे या बुलेट ट्रेनला साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन इंदापूर तालुक्यातील लाकडी, निंबोडी, सणसर, जाचकवस्ती, बेलवाडी, थोरातवाडी, कर्दनवाडी, परीटवाडी, कळंब, निमसाखर, खोरोची, बोराटवाडी या १३ गावांतील बागायती क्षेत्रातून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. बुलेट ट्रेन इंदापूर तालुक्यातून जाणार असून तिचे सर्वेक्षण सुरू आहे. बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातून १३ गावांमधून सोलापूर जिल्हाकडे मार्गस्थ होणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी १७.५ मीटर रुंदीची जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. बागायती भागातून शेतामधून व घरावरुन बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित आहे. हे काम तातडीने दोन महिन्यांमध्ये संपविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहे. याचे सर्वेक्षणाचे काम इंदापूर तालुक्यात सुरु आहे. बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्या शेतामधून बुलेट ट्रेन गेल्यास शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका आहे. तसेच बागायती क्षेत्रातून बुलेट ट्रेन जाणार असल्यामुळे शेती व्यवसायाचे प्रचंड नुकसान होणार आहे.
-------------------------
मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प पूर्णपणे बागायती भागातून जाणार आहे. या भागात सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तसेच या भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. यामुळे या भागातील शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत येणार असल्याने या प्रकल्पाला सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विरोध करणार आहे.
- पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष राज्य साखर संघ