पुणे : शहर झपाट्याने वाढते आहे...लोकसंख्येसोबत वाहनसंख्या वाढतेय...चौका-चौकांत वाहतुकीची कोंडी नित्याचीच...काही चौकांना सिग्नलच नाहीत... वाहतूक पोलीस २२ सिग्नलचा प्रस्ताव देतात...पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वाहतूक पोलिसांच्या वारंवार बैठका होतात...आणि वर्षभरात बसतो केवळ एकच सिग्नल... ही आहे पालिकेची कार्यतत्परता..शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्याच्या रस्त्यांवर वर्षाला लाखो वाहनांची भर पडत चालली आहे.काही नवीन भाग शहराच्या हद्दीत समाविष्ट झालेला आहे, तर शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. शहरातील ज्या महत्त्वाच्या ठिकाणांवर नवीन सिग्नल बसविणे आवश्यक आहे, अशी २२ ठिकाणे निश्चित करून त्यांची यादी वाहतूक पोलिसांनी पुणे पालिकेला दिली होती. यामध्ये प्रभात रस्ता, शिवाजी चौक, वि. स. खांडेकर चौक, मिलेनियम गेट, नवले पुलाखालील चौक, दत्तनगर जंक्शन, माउली पेट्रोलपंप, सिद्धार्थ सोसायटी, डी. एस. के. रानवारा चौक, राजस सोसायटी चौक , किराड चौक, बेनकर चौक, आंबेडकर चौक, गॅरिसन इंजिनियरिंग चौक, बनकर चौक, मांजरी फाटा, तुकाईदर्शन चौक, अॅमेनोरा मेनगेट, झेड प्लस, मगरपट्टा सिटी साउथ गेट, काळुबाई चौक, यशवंत नगर चौक, दत्तमंदिर चौक, एनआयबीएम चौक या चौकांचा समावेश होता. या चौकांची सद्य:स्थिती पाहता दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूककोंडी होते. या चौकांची मर्यादा आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे वाहनचालक रस्ता काढण्यासाठी वेडीवाकडी वाहने गर्दीत घालतात. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या या प्रस्तावावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत बैठकाही घेतल्या; परंतु नेहमीप्रमाणे लालफितीचा कारभार आडवा आला. मनपाच्या तज्ज्ञांनी या २२ पैकी केवळ दहाच सिग्नल तातडीचे असल्याचे ठरवून टाकले. हे दहा सिग्नल तातडीने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र प्रत्यक्षात वर्षभरात केवळ एकच सिग्नल बसविण्यात आला. एनआयबीएम चौकात बसविलेल्या या सिग्नलचेही नुसतेच दिवे बसविण्यात आले आहेत. त्याचे प्रत्यक्ष काम मात्र अद्यापही सुरूच झालेले नाही. वाहतूककोंडीचा दिवसागणिक सामना करणाऱ्या पुणेकरांचा त्रास कमी होण्याऐवजी पालिकेच्या उदासीन कारभारामुळे त्यात भरच पडत चालली आहे. कोणत्या चौकांमध्ये हवेत सिग्नल ?प्रभात रस्ता : या रस्त्यावर घोडके चौक आहे. या चौकात कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकामधून येणारा रस्ता मिळतो व पुढे भांडारकर रस्त्याकडे जातो. या चौकात दररोज वाहतूककोंडी होते.शिवाजी चौक : विद्यापीठाकडून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाषाण येथे मुख्य जंक्शन आहे. तेथून सूस रस्त्याकडे व हिंंजवडी आयटी पार्ककडे जाणारे हे टी जंक्शन आहे. वि. स. खांडेकर चौक : सेनापती बापट रस्त्यावर बालभारती समोरच हे टी जंक्शन आहे. येथून एक रस्ता बीएमसीसी महाविद्यालयाकडे जातो. मिलेनियम गेट : चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यासमोरील टी जंक्शन आहे, येथून पुणे विद्यापीठात जायला रस्ता आहे. नवले चौक : मुंबई-बंगळुरू महामार्गावरच्या बाह्यवळण रस्त्यावर ‘वाय’ आकाराचे हे जंक्शन आहे.दत्तनगर जंक्शन : पुणे-सातारा रस्त्यावर सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल व्यवस्था नाही.माउली पेट्रोल पंप : पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेलकडे जाणाऱ्या मुख्य बाणेर रस्त्यावर मिळणारा एक रस्ता आहे. हा रस्ता पुढे विधातेवस्तीकडे पल्लोड फार्मकडे जातो. टी जंक्शनसिद्धार्थ सोसायटी /शिवाजी हायस्कूल : ‘पुणे विद्यापीठ ते औंध मार्गा’वरून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे हे टी जंक्शन औंध गावात आहे. हा रस्ता स्पायसर महाविद्यालय, नवी सांगवी, खडकी रेल्वे स्थानकाकडे जातो.राजस सोसायटी चौक : कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरचे हे टी जंक्शन आहे. एक रस्ता राजस सोसायटीमार्गे बिबवेवाडीकडे येतो.किराड चौक : साधुवासवानी रस्त्यावरती पोलीस आयुक्तालयाच्या समोरील चौक. या चौकामधून नेहरू मेमोरियल, जहाँगिर रुग्णालय, ब्लू नाईल हॉटेल; तसेच स्टेट बँक आॅफ इंडीयाकडे जाता येते.बेनकर चौक : धायरी गावठाणामधील ‘सिंहगड रस्ता ते धायरी’ दरम्यान असलेले हे टी जंक्शन.डॉ. आंबेडकर चौक : ‘पौड फाटा ते वारजे जंक्शन’कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा चौक.गॅरिसन इंजिनियरिंग चौक : ‘गुंजन चौक ते विमानतळा’कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा चौक असून, विश्रांतवाडी चौकाकडून येणारा सहापदरी मुख्य रस्ता आहे. तसेच, बर्मासेल कंपनीकडे जाणारा रस्ता आहे. बनकर चौक : पुणे-सासवड रस्त्यावर ग्लायडिंग सेंटरसमोरचे टी जंक्शन आहे. येथून एक रस्ता सातवनगर व सोलापूर रस्त्याकडे जातो.मांजरी फाटा : सोलापूर महामार्गावरील मांजरी गावाकडे जाणारा रस्ता. तुकाईदर्शन चौक :पुणे-सासवड रस्त्यावरच्या तुकाईदर्शन चौकामधून एक रस्ता तुकाई टेकडीकडे जातो, तर विरुद्ध बाजूचा रस्ता सोलापूर महामार्गाला जाऊन मिळतो.अॅमेनोरा मेनगेट, झेड प्लस, मगरपट्टा सिटी साऊथ गेट : तीनही चौक खराडी बाह्यवळण व सोलापूर रस्त्याकडे जातात. मगरपट्टा रस्त्यावर मुंढवा रेल्वे उड्डाणपूल ते सोलापूर रस्ता जंक्शनवरील नोबल हॉस्पिटल दरम्यान हे तीनही चौक आहेत. याठिकाणी वाहतूक कायमच खोळंबलेली असते. काळुबाई चौक : पुणे-सोलापूर रस्त्यावरील या चौकामधून एमआयडीसी हडपसर व पुढे मगरपट्टा सिटीकडे जाता येते. यशवंत नगर चौक (रॅडिसन हॉटेल चौक) व रिलायन्स मार्ट चौक : हे दोन्हीही चौक खराडी बाह्यवळण ते मुंढवा रस्त्यावर असून, दोन्ही चौकांमधून खराडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. तसेच चंदन नगरकडे जाणारे रस्ते आहेत. दत्तमंदिर चौक : हा चौक पुणे-नगर रस्त्यावर आहे. वडगाव शेरीमधून विमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा चौक आहे. चौकामध्ये नवीन विमानतळ रस्त्यावरून येऊन श्रीकृष्ण हॉटेल चौकमार्गे नगर रस्त्याला मिळणारा मुख्य रस्ता येतो. एनआयबीएम चौक : कोंढव्यातील ‘ज्योती हॉटेल जंक्शन ते उंड्री’कडे जाणाऱ्या रस्त्यावरील हा मुख्य चौक आहे.
वर्षभरात बसला केवळ एकच ‘सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:37 IST