येथील कुकडी नदीच्या कडेला हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन भावांपैकी एकाचा पाय घसरून नदीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली.
मनसुख मारुती मोरे (वय ३८, रा. रांधे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी: मनसुख मारुती मोरे व त्याचा भाऊ पोपट मोरे हे कामानिमित्ताने मंगरूळ पारगाव परिसरातून जात होते.
तेथील कुकडी नदीवर असलेल्या केटी वेअरच्या कडेला हातपाय धुण्यासाठी थांबले असता मनसुख मोरे यांचा पाय घसरून ते नदीपात्राच्या खोल पाण्यात पडले त्याचा भाऊ व ग्रामस्थ यांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात पोपट मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले पुढील तपास करत आहेत.