पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर जबर मारहाण करीत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. किसन रामभाऊ रावडे (वय ७०, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक भुषण दायमा यांनी फिर्याद दिली आहे. रावडे यांचा मृतदेह फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती डेक्कन पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रावडे हे निवृत्त महापालिका कर्मचारी आहेत. त्यांना दोन मुले असून ते सध्या धाकट्या मुलाकडे राहत होते. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार रावडेंच्या डोक्यामध्ये अंतर्गत जखमा झाल्या होत्या. तसेच जबर मारहाणीमुळे त्यांच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त साठले होते. रावडेंना जबर मारहाण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंभीर घटना घडण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरी खालावली असून मागील काही महिन्यांपासून केवळ कागदी घोडे नाचवण्यात तपास पथकाचे अधिकारी व्यस्त आहेत. कोणतीही महत्वपुर्ण कामगिरी या अधिका-यांकडून होताना दिसत नाही. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फर्ग्युसन रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, डेक्कन परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा मसाज पार्लर सुरु आहेत. पोलिसांनी हॉटेल्स, मसाज पार्लर तसेच बेकायदा धंद्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
फर्ग्युसनच्या मैदानावर वृद्धाचा खून
By admin | Updated: June 2, 2014 22:34 IST