पुणे : भारतातील ४० केंद्रांवर होणाऱ्या सैन्यदलातील शिपाई भरती परीक्षेचा पेपर फोडण्यामध्ये लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी, भरतीसाठी क्लास चालविणारे चालक, तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. आरोपीकडून हस्तगत केलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी १०० टक्के जुळत असल्याने ही परीक्षा रद्द केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
किशोर गिरी (वय ४०, रा. माळेगाव, बारामती), माधव गित्ते (वय ३८, रा. सॅपर्स विहार कॉलनी), तसेच गोपाळ कोळी (वय ३१, रा. बीईजी सेंटर, दिघी) उदय आवटी (वय २३, रा. बीईजी खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किशोर गिरी हा सैन्यभरती संबंधी क्लास चालवितो़ तर, माधव गित्ते हा जानेवारीअखेर लष्करातून हवालदार पदावरून निवृत्त झाला आहे. गोपाळ कोळी हा ट्रेनिंग बटालियन २ मध्ये कवायत प्रशिक्षक आहे. उदय आवटी हा रेजिमेंटल पोलीस म्हणून लष्करात कार्यरत आहे. याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी आर्मी शिपाई भरतीची लेखी परीक्षा होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका भरघोस रकमेला विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली होती. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख व खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामती येथे छापा मारुन किशोर गिरी व माधव गित्ते यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात माधव गित्ते याच्याकडे फोडलेली प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या रात्री आली होती. त्याने १४ परीक्षार्थींना देण्यासाठी विश्रांतवाडी येथील समृद्धी हॉटेल येथे एकत्र केले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश ऊर्फ गोट्या शंकर गोसावी (रा. माळेगाव, बारामती), कुमार परदेशी (रा. फलटण, जि. सातारा) आणि भरत (रा. जळगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
त्याचवेळी आणखी एक टोळी पेपर फोडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अली अख्तरखान (वय ४७, रा. गणेशनगर, बोपखेल), आजाद लालमहंमद खान (वय ३७, रा. गणेशनगर, बोपखेल, दोघे मुळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय ३७, रा. आशाधन सोसायटी, दिघी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे प्रत्येक परीक्षार्थीकडून १ लाख रुपये घेऊन पेपर आणून देणार असल्याची माहिती दिली. त्यांना दिघी येथील साईबाबा मंदिर येथे सापळा रचून पकडण्यात आले.