पुणे : महापालिकेच्या जकात नाक्यांच्या जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) मिळण्याचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. पालिकेच्या ताब्यातील चार नाक्यांच्या जागा पीएमपीला देण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे पीएमपीला या जागांचा वापर बस पार्किंग, बसस्थानक तसेच बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी करता येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पीएमपीची १३ आगार आहेत. तर, पीएमपीच्या मालकीच्या व भाडेतत्त्वारील अशा सुमारे २ हजार बस आहेत. यांपैकी अनेक बस रात्री रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. दोन्ही शहारांचा झालेला विस्तार तसेच शहराबाहेर दिली जाणारी सेवा यांमुळे पीएमपीला आणखी आगार वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी जकात नाक्यांच्या जागा पीएमपीला देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती.त्यानुसार सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी येथील ३२ हजार चौरस मीटर, सासवड रस्त्यावरील भेकराईनगर येथील २३ हजार ६०० चौरस मीटर, सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथील २१ हजार ७०० चौरस मीटर आणि पौड रस्त्यावरील बावधन येथील ७ हजार ८०० चौरस मीटर जागा पीएमपीला भाड्याने देण्याच्या निर्णय पालिकेने घेतला आहे.पीएमपीला या जागा ३० वर्षांसाठी देण्यात येणार असून, दर वर्षी जागेच्या भाड्यामध्ये साडेबारा टक्के वाढ केली जाणार आहे. तसेच, या जागा बीओटी तत्त्वावर वापरता येणार नाहीत. त्यासाठी पीएमपीला सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
जकात नाक्यांच्या जागा ‘पीएमपी’ला
By admin | Updated: December 22, 2016 02:38 IST