*लोकमतचा दणका*
नागरिकांची दमछाक थांबणार : पीएमआरडीचे अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी
यवत : येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे विकास आराखड्यावर हरकती नोंदविण्याची सोय शेतकरी व नागरिकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. मागील दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’मधून याबाबतचे ठळक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.
दौंड तालुक्यातील पीएमआरडीएमध्ये समाविष्ट होणारी ५१ गावे एका टोकाला असताना विकास आराखड्यावर हरकती घेण्यासाठी दौंड तहसील कार्यालयात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय अधिक होत होती. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे यवत येथे हरकती घेता येतील, अशी सोय करण्याची मागणी केली होती. पीएमआरडीए अंतर्गत दौंड तालुक्यातील ५१ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पीएमआरडीएच्या वतीने समाविष्ट गावांमधील प्रारूप विकास आराखडा २ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. संबंधित आरक्षणे व प्रस्तावित रस्त्यांबाबत जमीन मालकांना हरकती नोंविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. नंतर शेतकऱ्यांनी याबाबत योग्य माहिती ऑनलाइनदेखील उपलब्ध होत नसल्याची ओरड केल्यानंतर सदर मुदत आणखी १५ दिवस वाढवून देण्यात आली आहे. मात्र मुदत वाढवून मिळाली तरी हरकती घेण्यासाठी पुणे अथवा तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाण्याचे सांगितले गेले होते.
दौंड तालुक्यात पीएमआरडीएमध्ये समाविष्ट झालेली गावे एका टोकाला तर दौंड तहसील कार्यालय दुसऱ्या टोकाला अशी परिस्थिती होती. यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना यामुळे ४० किलोमीटर उलटा प्रवास करावा लागणार होता. आता संबंधित हरकती घेण्यासाठी यवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये सोय होत असल्याने नागरिकांना सोयीचे ठरणार आहे. मंगळवारी सायंकाळी पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता अक्षय गुजर व अर्जुन पाटील यांनी यवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सदानंद दोरगे, दत्तोबा तांबे, मंगेश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकती नोंदविण्याची सोय बुुधवार (दि.१) पासून सुरू होणार आहे. दौंड तालुक्यातील समाविष्ट ५१ गावातील नागरिकांनी येथे येऊन उर्वरित कालावधीत हरकती नोंदविण्याचे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आली आहे.
संजय पाटील, तहसीलदार, दौंड
दौंड तालुक्यातील समाविष्ट करण्यात आलेल्या ५१ गावांमधील नागरिकांना यवत मधील क्षेत्रीय कार्यालय मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोईचे ठरू शकते. यामुळे दौंड तालुक्यातील यवत मध्ये पीएमआरडीएचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याची मागणी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.
वैशाली नागवडे, अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस.
३१ यवत