लोकमत न्यूज नेेटवर्क
पुणे : राज्यातील निर्यातक्षम शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. द्राक्ष, आंबा, केळी निर्यातीत राज्य देशात अव्वल असून आता भाजीपाल्यातही आघाडी घेण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.
कोविडकाळातही राज्यातून १३ हजार ८७७ कोटी रुपयांची निर्यात झाली. यात बहुतांश फळफळावळ आहे. त्यातही द्राक्षांच्या देशातील एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ८० टक्के आहे. राज्यातील सुमारे ७० हजार शेतकरी निर्यात वृद्धीसाठी स्थापन केलेल्या संकेतस्थळाचा लाभ घेतात. ही संख्या किमान २ लाख व्हावी असा राज्याच्या निर्यात विभागाचा निर्धार आहे. फळांसह सर्व प्रकारचा भाजीपालाही निर्यात व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना निर्यात कक्षाला देण्यात आल्या आहेत. यासाठीच्या संकेतस्थळाला शेतकरी जोडून घेण्याविषयी सांगण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना निर्यातीसाठीचे परदेशातील बाजारपेठेसह मालाचा दर्जा, गुणवत्ता कशी सांभाळावी अशी सर्व माहिती दिली जाते. त्याचबरोबर संकेतस्थळावरून शेतकरी आपापसात माहितीची देवाणघेवाण करू शकतात. यातून एकमेकांच्या यशस्वी-अयशस्वी उपक्रमांची माहिती होते, त्याप्रमाणे उपाय करता येतात.
केंद्र सरकारने निर्यात वृद्धीसाठी अपेडा (कृषी उद्योग प्रक्रिया निर्यात प्राधिकरण) ही संस्था स्थापन केली आहे. त्यांच्याकडून सर्व राज्यांना निर्यातीसाठी सर्व प्रकारचे उत्तेजन, माहिती, मार्गदर्शन केले जाते. त्याच धर्तीवर राज्याच्या कृषी विभागाने स्वतंत्र निर्यात कक्ष स्थापन केला आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी ८ ते १० प्रकारची संकेतस्थळ ‘व्हेज नेट’अंतर्गत स्थापन केली आहेत. या निर्यात कक्षाच्या माध्यमातून राज्यात निर्यात वाढवण्याची मोहीम राबवली जात आहे.
चौकट
“मालाची गुणवत्ता उच्च दर्जाची असणे ही निर्यातीसाठीची सर्वांत महत्त्वाची अट आहे. राज्यातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने या कसोटीवर खरे उतरत आहेत. येत्या काही वर्षांत शेतमाल निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा बराच मोठा असेल.”
-गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, राज्य निर्यात कक्ष