पुणे : मराठी भाषेत कसदार लिहिती-वाचती पिढी घडावी, यासाठी ‘भाषा’ संस्थेतर्फे अभिनव अशी ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’ ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी असून,११ आॅक्टोबर २०१५ रोजी तिची पहिली फेरी कोथरूड येथील भारतीय विद्या भवन येथे होणार आहे.परीक्षेसंदर्भातील माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठी भाषा आॅलिम्पियाड ही परीक्षा इयत्ता पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमातील संकल्पनांवर आधारित असून, ज्ञान, आकलन, उपयोजना व कौशल्य अशा चार घटकांचा विचार करून या परीक्षेची बांधणी करण्यात आली आहे. या वर्षी पुणे शहरात व पुढील वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रात ही घेण्याचा मानस आहे. ही परीक्षा दोन स्तरांमध्ये होणार असून, तिची पहिली पायरी ‘भाषा परिचय’ ही असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले २०० विद्यार्थी ‘भाषा प्रगती’ या पुढील परीक्षेसाठी पात्र ठरतील. (प्रतिनिधी)
आता मराठी भाषा आॅलिम्पियाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2015 00:48 IST