ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करणाऱ्या दत्तू मसू शिंदे, रमेश शंकर गुंजाळ व संजय नागू जाधव यांना अतिक्रमण काढण्याची नोटीस आणि रमेश नारायण पवार यांच्यावर पोलीस कारवाई होणेबाबत तक्रारी अर्ज आणि अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत सरपंच राजेंद्र मेहर यांनी सांगितले की, वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर याठिकाणी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक बोअरवेल घेतले असून त्यासाठी एक शेड बांधण्यात आलेले आहे. या शेडच्या बाजूला शेजारी राहणारे रमेश नारायण पवार यांनी या शेडचे कुलूप तोडून यामध्ये त्यांचे वैयक्तिक सामान ठेवले आहे. तसेच त्यांनी रस्त्यालगत गोठा केला आहे व या गोठ्यातील जनावरे कधीही सुटून रस्त्यावर येऊन अनेक वेळा अपघात झालेले आहे. त्यांना वारंवार सूचना देऊन त्यांनी त्यास कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस कारवाईसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आला असून, इतर तीन जणांना अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे.
याप्रसंगी उपसरपंच माया डोंगरे, सदस्या राजश्री काळे, ज्योती संते, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी उपस्थित होते.
वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत ज्या कोणी अतिक्रमणे केली असतील त्यांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा ग्रामपंचायत मार्फत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल अशी माहिती वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली.