कोरेगाव भीमा: ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील २७ गावांतील गुन्हे दाखल असलेल्या ४३६ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाईचा इशारा नोटिसांद्वारे देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उमेश तावसकर बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वामी , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात , पोलीस पाटिल मालन गव्हाणे व ग्रामस्थ , उमेदवार उपस्थित होते.
शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील हिवरे, खैरेनगर व आपटी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवणे, गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, ज्या उमेदवारांवर दोन व दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशांवर लक्ष ठेवणे आदी कार्यवाही सुरू आहे.
शिक्रापूर, तळेगाव-ढमढेरे, सणसवाडी, कोरेगाव-भीमा, वढू बुद्रूक, पिंपळे- जगताप, करंदी, केंदूर, पाबळ , मुखई, जातेगाव बुद्रूक, कोंढापुरी ही अतिसंवेदनशील गावे म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत. या गावांतील बेजबाबदार वर्तन करणारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचेही तावसकर यांनी सांगितले. दरम्यान आपण स्वत: प्रत्येक गावात भेटी देत असून सामान्य नागरिकांना तक्रारी असतील तर त्या लेखी स्वरूपात शिक्रापूर पोलिसांकडे पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
११ कोरेगाव भीमा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलीस निरिक्षक उमेश तावसकर.