लक्ष्मण मोरे, पुणेपुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या १९८७ च्या मंजूर विकास आराखड्याच्या पुनरावलोकनासाठी तब्बल ८० हजार हरकती आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हरकतीबाबत सूचना मांडण्यासाठी चक्क एका बारा वर्षांच्या मुलीला पत्र पाठविण्यात आले आहे. तिच्या कुटुंबीयांनीही हरकत घेतलेली नाही, तरी तिचे नाव कसे आले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे एकंदरच हरकती- सूचनांच्या पारदर्शकतेबाबतच प्रश्न ॅनिर्माण झाला आहे. या अल्पवयीन मुलीला महापालिकेचे आलेले पत्रच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीमध्ये राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीच्या नावाने महापालिकेने पत्र पाठवले आहे. पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा या विषयाशी कसलाही संबंध नसताना महापालिकेचे हे पत्र आल्यामुळे आम्हीच गोंधळात पडलो असल्याचे या मुलीच्या वडिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातून अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या नावे आणि काही जणांनी नागरिकांच्या नावे परस्परच हरकती आणि सूचना पाठवून दिल्याचे स्पष्ट झाले होते. काही दिवसांपूर्वी हयात नसलेल्या अनेकांच्या नावाने हरकती आल्याचेही निदर्शनास आले होते. हरकती आणि सूचनांसाठी स्थापन समितीपुढे सुनावणी सुरू आहे. ज्यांनी लेखी स्वरूपात आपल्या हरकती आणि सूचना पाठवल्या होत्या त्या समितीसमोर मांडण्यासाठी हजर राहावे अशा आशयाचे पत्र पालिकेतर्फे नागरिकांना पाठविण्यात येत आहे.
हरकतीची मुलीला नोटीस
By admin | Updated: August 12, 2014 03:45 IST