लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वॉर्डस्तरीय विकासनिधीतून केलेल्या कामांवर आणि दिशादर्शक फलकांवर काही नगरसेवक ‘संकल्पना’ म्हणून आपले नाव जागोजागी टाकत आहेत. नगरसेवकांच्या या फुकटच्या प्रसिद्धीविरोधात सुराज्य संघर्ष समिती न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
समितीचे विजय कुंभार यांनी याप्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचे सांगत, या याचिकेत अनावश्यक खर्च संबंधित नगरसेवकांकडून वसूल करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
शहरातील विविध रस्ते, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, विविध संस्था, लोकप्रतिनीधींची निवास्थाने आदी ठिकाणी महापालिकेकडून नामफलक लावले जातात. याच ठिकाणी पुन्हा त्या-त्या प्रभागातील नगरसेवक ‘संकल्पना’ म्हणून स्वतःचे नाव टाकून पुन्हा नामफलक (पाट्या) लावतात. त्यात एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने एका ठिकाणी चार-चार नामफलक उभारले जातात.
या सर्व पार्श्वभूमीवर सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार न्यायालयात याचिका दाखल करीत असून, या याचिकेवर स्वाक्षऱ्या करण्याचे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले आहे.