पिंपरी : परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी चिंचवडमधील कार्यालयात पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र माने यांची पुण्यातील गुप्तवार्ता विभागात बदली झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. तेली यांची १५ मे रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात नेमणूक झाल्यानंतर १८ मे रोजी त्यांच्याकडे परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. या अगोदर ते औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदावर कार्यरत होते. बेळगाव, रायबाग येथील हंदीगुंद हे डॉ. तेली यांचे मूळ गाव आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण याच गावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण बेळगावात, तर एमबीबीएसचे शिक्षण मंगळूर येथे झाले. २०१०मध्ये आंध्र प्रदेश केडरमधून भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. डिसेंबर २०१२मध्ये महाराष्ट्रात नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमीत तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचे पहिले पोस्टिंग झाले. फेबु्रवारी २०१४मध्ये औरंगाबाद ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी १ वर्षे ३ महिने काम केल्यानंतर पुणे पोलीस आयुुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. तेली यांच्या पत्नी रायगड येथे जिल्हाधिकारी आहेत. तसेच मोठे बंधू आयआरएस अधिकारी आहेत. बंधूंनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर लगेचच बंगळुरू येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. यूपीएससीमध्ये यश मिळाले आणि त्यांची ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली. पत्रकारांशी बोलताना डॉ. तेली म्हणाले, ‘‘यापूर्वी ग्रामीण पोलीस दलात काम केले असून, शहरातील ही पहिलीच पोस्टिंग आहे. ग्रामीण आणि शहरातील कामाची पद्धत वेगळी असते. शहरात कामाचा वेग अधिक असतो. शहराविषयी माहिती जाणून घेत असून, त्यानुसार आखणी करणार आहे.’’
नवनियुक्त पोलीस उपायुक्त तेली यांनी स्वीकारला पदभार
By admin | Updated: May 20, 2015 01:07 IST